राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे खोट्या बातम्या पसरवित आहेत. तुम्ही अकार्यक्षम आहात तुम्ही आणि तुमच्या आईनी चीनकडून पैसे घेतले, असा गंभीर आरोप नड्डा यांनी केला आहे.

सोशल मीडियाचा गैरवापर आणि पीएम केअर्स फंडाबद्दल राहुल गांधी यांनी वृत्तपत्रातल्या काही बातम्यांचा आधार घेत प्रश्न विचारले होते. त्यावरून नड्डा चांगलेच संतापले आहेत. त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसवर आरोप करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचं सगळ करियर हे खोट्या बातम्या पसरविण्यातच गेलं असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.

तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले. यापेक्षा खालच्या पायरीवर कोणी जाऊ शकत का असा सवालही त्यांनी केला आहे. सर्व देशाचा प्रंतप्रधानांवर विश्वास आहे. पीएम केअर फंडातल्या प्रत्येक पैशाचा हिशेब आहे आणि लोकांच्या हितासाठीच तो पैसा वापरला जातोय, असेही जे.पी.नड्डा यांनी म्हटले आहे.