पहिल्यांदाच कोणी ‘हिंदू’ बनला पाकिस्तानी वायुसेनेमध्ये ‘पायलट’, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एअरफोर्समध्ये पायलट म्हणून एका हिंदू तरूणाची निवड झाली आहे. राहुल देव नावाच्या या तरुणाची पाकिस्तानी हवाई दलात जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती झाली आहे. पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली.

राहुल देव हा सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या थरपारकरचा राहणारा आहे. पाकिस्तानमधील थरपारकर हे असे ठिकाण आहे, जेथे मोठ्या संख्येने हिंदू समुदाय राहतो. विकासापासून वंचित असलेल्या या भागातील राहुल हा पाकिस्तान हवाई दलात पोहोचणारा पहिला माणूस आहे.

‘ऑल पाकिस्तान हिदू पंचायत’चे सचिव रवी दवानी यांनी राहुलच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील बरेच सदस्य नागरी सेवेत तसेच सेनेच्या इतर भागातही सेवा करत आहेत. विशेषत: देशातील अनेक मोठे डॉक्टर हिंदू समुदायाशी संबंधित आहेत.

ते पुढे म्हणाले की, जर सरकारने अल्पसंख्याकांकडे लक्ष दिले तर येत्या काळात अनेक राहुल देव देशाची सेवा करण्यास तयार असतील.