PM मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. मोदींच्या मन की बातवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिप्पणी केली आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची ‘बात’ कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. संपूर्ण देशाला सत्य काय आहे हे ऐकायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकारने कोरोनाची साथ आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केलेल्या आहेत, असे एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने होत असून देशातील नव्या भागांमध्ये देखील हा संसर्ग पसरत चालला आहे. भारत सरकारकडे या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही. पंतप्रधानांनी मौन धारण केले आहे. त्यांनी कोरोना साथीपुढे शरणागती पत्कारली आहे आणि कोरोनाशी लढण्यास इन्कार केला असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखाहून अधिक झालेली असताना राहुल गांधी यांनी या मुद्यावरून मोदी सरकारवर नशाणा साधला आहे.