Coronavirus : ‘संकटाच्या काळात काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते तुमच्या सोबत उभे आहेत’, राहुल गांधींनी PM मोदींना पत्र लिहून सांगितलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसकडे पाहता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या देश मोठ्या मानवतेच्या संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत मी आणि कॉंग्रेस पक्षाचे लाखो कार्यकर्ते तुमच्या सोबत उभे आहेत. देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात आम्ही सरकारच्या प्रत्येक पावलात सहकार्य करत आहोत. कोविड -१९ विषाणूचा तीव्र प्रसार रोखण्यासाठी जगाला त्वरित पावले उचलणे भाग पडले आहे आणि भारत सध्या तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये आहे. मला शंका आहे की अखेरीस याला आणखी वाढवेल.

राहुल गांधींनी लिहिले आहे की, भारताची परिस्थिती काही वेगळी आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पूर्ण लॉकडाउन रणनीतीचे पालन करणाया इतर मोठ्या देशांपेक्षा आपल्याला वेगळी पावले उचलावी लागतील. भारतात दररोजच्या उत्पन्नावर अवलंबून असणारी गरीब लोक संख्या मोठी आहे. यामुळे सर्व आर्थिक क्रिया एकतर्फीपणे थांबवणे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. या संपूर्ण आर्थिक बंदमुळे कोविड -१९ विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या आणखी वाढेल. या कठीण परिस्थितीत सामान्य लोकांच्या समस्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. या विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून वृद्धांना कशी सुरक्षा दिली जाईल आणि कसे आयसोलेट केले जाईल यासाठी आपले प्राधान्य असले पाहिजे. तसेच वृद्ध लोकांच्या जवळ जाणे त्यांच्यासाठी किती धोकादायक आहे, असा संदेश तरुणांना दिला पाहिजे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी लिहिले आहे की, देशातील लाखो वृद्ध लोकं खेड्यात राहतात. देशात पूर्ण बंदीमुळे लाखो बेरोजगार तरुणही गावी परततील. यामुळे खेड्यात राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांना संसर्ग होण्याचा धोका वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव जाऊ शकतो. या विचित्र परिस्थितीत आपण सामाजिक सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला हे सुनिश्चित केले पाहिजे की, नोकरदार गरिबांना सरकारी संसाधनांद्वारे मदत मिळावी. लोकांची वाढती संख्या पाहता हजारो बेड आणि व्हेंटिलेटर असलेली मोठी रुग्णालये आवश्यक असतील. गरजा लक्षात घेता या सर्व गोष्टी शक्य तितक्या वेगाने निर्माण केल्या पाहिजेत. तसेच चाचण्यांची संख्याही वाढवली पाहिजे जेणेकरुन विषाणूच्या प्रसाराविषयी अचूक डेटा मिळू शकेल आणि त्यापासून बचाव करण्यासाठी पावले उचलता येतील.

राहुल गांधींनी पुढे लिहिले आहे की, अचानक लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. कारखाने, छोट्या गिरण्या व बांधकाम बंद झाले आहे. हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी जात आहेत. ते राज्यांच्या सीमेवर अडकले आहेत. ते त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. यावेळी त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले पाहिजेत जेणेकरून पुढील काही महिन्यांपर्यंत त्यांना मदत होईल. लॉकडाऊन आणि आर्थिक बंदमुळे आपल्या आर्थिक संस्थांवरही परिणाम होईल, म्हणून त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे.