राहुल गांधी यांचा राजीनामा ठरेल काँग्रेसची आत्महत्या : ‘या’ बड्या नेत्याचे वक्तव्य 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था- लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरु झाली आहे. लोकसभेतील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु झाले असून विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत. या सगळ्यांबरोबरच आणखी एक धक्कादायक राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे केला होता. मात्र केंद्रीय कमिटीने तो मंजूर केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

यावर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांचा राजीनामा म्हणजे काँग्रेसची आत्म्यहत्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘द टेलिग्राफ’ ने यासंबंधी वृत्त दिले आहे. ‘राहुल गांधीनी राजीनामा दिला तर काँग्रेस आणि संघ विरोधी पक्षांसाठी आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे राहुल गांधींनी भाजपच्या या जाळ्यात अडकू नये’, असे लालूंनी म्हटले आहे. त्याचबरोबर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष केले तर काय होईल, या प्रश्नावर त्यांनी भाष्य करताना म्हटले आहे कि, ‘जर काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष केलं, तर ती व्यक्ती गांधी कुटुंबाच्या हातातील बाहुला आहे, असे आरोप त्या व्यक्तिवर होतील. त्यामुळे राहुल गांधींनी राजकीय हुकुमशाहांना अशा प्रकारची संधी का द्यावी?’,

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना ते म्हणाले कि, हा पराभव आम्हा सगळ्या सहकाऱ्यांचा आहे आणि त्यावर सर्वांनी एकत्र येऊन विचार करावा आणि पुढील वाटचाल करावी.