शिवप्रेमींमध्ये आनंद ! रायगडाचा रोपवे सुरु करण्याचे आदेश

महाड : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन आणि जागेच्या वादात अडकलेला रायगड येथील रोपवे खुला करण्याचा आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनलॉक नंतर रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येऊ लागले. मात्र रोपवे बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र रायगडावर जाण्यासाठी १ हजार ४०० पायऱ्या आणि खडतर अंतर पायी पार करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ व्यक्ती, लहानमुले तसेच सर्वसामान्यांना रायगड सहज पाहता यावा यासाठी १९९६ मध्ये रोपवे तयार करण्यात आला. यामुळे केवळ ४ मिनिटात अनेकांना रायगडावर पोहोचणे शक्य झाले.

या रोपवेमुळे रायगडावरील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. व्यवसाय वाढले. मात्र लोकडाऊनमुळे आठ महिने रायगड किल्ला आणि व्यवसाय बंद होते. याकाळात व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. अनलॉकनंतर पर्यटन स्थळे खुली असताना रायगड व पाचाड अशी संरक्षित स्थळे मात्र बंद होती. याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले होते. किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला, तरीही रोपवे मात्र बंद होता. त्याच दरम्यान रोपवे जागेच्या वादात सापडला. हिरकणी वाडी येथील औकिरकर कुटुंबीयांनी रोपवेच्या जागेवर आपला हक्क सांगत या ठिकाणी पर्यटकांना आणि रोपवे प्रशासकांना मज्जाव केला होता. त्यानंतर रायगड रोपवे प्रशासनाने म्हणजेच जोग इंजिनीअरिंग कंपनीने रोपवे सुरू करण्याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर रायगडावर येणाऱ्या पर्यटकांसह शिवप्रेमींचे हित लक्षात घेऊन महाड न्यायालयाने रायगड रोपवे खुला करण्याचे आदेश दिले आहेत. रोपवे प्रशासनाकडून ऍड. नितीन आपटे व जयश्री दोसी यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली होती.

दुरुस्तीनंतर रोपवे सेवेत
रायगड रोपवेच्या जागेबाबत औकिरकर कुटुंब आणि रोपवेमध्ये असलेला वाद न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. रोपवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच तो पर्यटकांसाठी खुला केला जाईल. असे व्यवस्थापक राजेंद्र खातो यांनी सांगितले.

नवीन रोपवेसाठी ५० कोटींची तरतूद
रायगड संवर्धन विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद ही नवीन रोपेसाठी करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी लवकरच नवा रोपे उभारला जाईल. असे रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

You might also like