पुण्यात गडगडाटासह पाऊस कोसळणार; राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगामी दोन दिवसांमध्ये शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहील असा अंदाज विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस पुण्यासह परिसरात आकाश निरभ्र राहणार आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल, असा इशारा विभागाकडून देण्यात आला. दरम्यान, शहरात 36.6 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर 16.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान हवामान विभागाने नोंदवले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्र आल्याने होणाऱ्या अंतरक्रियेच्या प्रभावामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी अनकुल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने 18 ते 20 मार्च या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे.