भाजपाने दिलेले ‘ते’ आश्वासन हवेतच ; स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँम्बेसेडर मनसेच्या मंचावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचे आश्वासन देऊनही भाजपाने ते पूर्ण केले नसल्याचा दावा स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँम्बेसेडर राहिलेल्या मोनिका मोरे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

मोनिका मोरे यांना पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात दोन्ही हात गमावले होते. त्यावेळी मोनिका मोरे यांना भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने कृत्रिम हात बसवण्यात आले. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाची तिला ब्रँड अँम्बेसेडर करण्यात आले. याचबरोबर पदवी मिळाल्यानंतर नोकरी आणि घर देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र भाजपाने नोकरी आणि घराचे आश्वासन पूर्ण न केल्याचे त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित सभेत मोनिका मोरे यांना मंचावर आणले होते. त्यावेळी काही महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर हाता-तोंडाची गाठ घालण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. घराचा कारभार आपल्यालाच चालवावा लागत आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज ठाकरे यांनी भांडुप येथील जाहीर सभेत मोदींचे मूळ गाव असलेल्या गुजरातमधल्या वडनगरमध्ये पुरेशी शौचालये नसल्याचा दावाही केला आहे.