‘त्यावेळी इंदिरा गांधींनाही RSSनं पाठिंबा दिला होता’ : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून बांग्लादेशची निर्मिती केली तेव्हा आरएसएसने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. आरएसएसने काँग्रेसला पाठिंबा दिला होता असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांग्लादेशची निर्मिती केली त्यानंतर आरएसएसने त्यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसला आरएसएसने पाठिंबा दिला होता. भाजपाच्या लोकांना एकदा विचारा, 75ला आणीबाणी आणली गेली, 77 निवडणुका झाल्या, त्यावेळी निवडणुकीत उभा असलेल्या जनता पक्षाला मतदान करणारे असंख्य काँग्रेसवाले होते. राजीव गांधींची, इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी अनेकांनी काँग्रेसला मतदान केलं. देश संकटात आल्यास वेगळा विचार करणं गरजेचं असतं.” असे राज ठाकरे म्हणाले.

‘एअर स्ट्राईकवेळी अमित शहा को पायलट होते का ?
‘यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरूनही अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, “पहाटे एअर स्ट्राईक झाला. त्यानंतर हवाई दलाच्या प्रमुखांकडे किती जण मेले याबाबत कोणतीही माहिती नव्हती. परंतु त्यानंतर अमित शहा यांनी 250 लोक मेल्याचं सांगितलं. मला अमित शहा यांना विचारायचं आहे की एअर स्ट्राईकवेळी तुम्ही का या को-पायलट म्हणून गेला होतात का ? हवाई दलाच्या प्रमुखांकडे मृतांचे आकडे नाही तर मग अमित शहा यांच्याकडे ही आकडेवारी कशी ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

‘बीफच्या व्यवसायात मोदींचे मित्र आहेत, मग देशभरात गोंधळ का घातला ?
‘गोमांसाच्या बंदीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बीफच्या व्यवसायात मोदींचे मित्र आहेत, मग देशभरात का गोंधळ घातला, गोमांसाच्या व्यवसायात त्यांचे काही मित्र आहेत असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते. असे असतानाही मोदींनी या गोष्टी का थांबवल्या नाहीत ? असा सवाल उपस्थित करत गोमांसावरून झालेल्या हत्यांवरून राज ठाकरे यांनी मोदींवर घणाघात केला आहे. याशिवाय, मोदींनी गोहत्या गोमांस यावरून वर्षभरात रान पेटवलं आणि आता ते धर्म, जात यावरून मतांची बेगमी करत आहेत असेही राज ठाकरे म्हणाले.