लॉकडाउनमध्ये चिथावणीखोर भाषण ! भाजपाच्या 2 आमदाराविरोधात FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन असतानाही चिथावणीखोर भाषण दिल्यामुळे राजस्थानमधील भाजपाच्या दोन आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटा येथील महावीर नगर पोलीस स्टेशनमध्ये रामगंजमंडीचे भाजपा आमदार मदन दिलावर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर जयपुरच्या मानसरोवर पोलीस स्टेशनमध्ये सांगानेरचे भाजपा आमदार अशोक लाहोटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिथावणीखोर भाषण करत लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मदन दिलावर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दिलावर यांच्याविरोधात संजय यादव यांनी तक्रार दाखल केली होती. विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर भाषण करून कोरोना आजाराविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिलावर यांचा 9 एप्रिल रोजीचा चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले असून कोरोना रोगांविषयी गैरसमज पसरवल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही केस सोपविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अमृता दुहान यांनी सांगितले.

अशोक लाहोटी यांच्याविरोधात रामचंद्र देवेंद्रा यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य आणि भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशोक लाहोटी यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो असे रामचंद्र देवेंद्रा यांनी तकृारीत नमूद केले आहे.