राम मंदिर : ना चांदीची विट, ना टाईम कॅप्सूल, जिल्हाधिकारी म्हणाले…

अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 22.6 किलो चांदीची विट ठेवतील, असा दावा केला जातोय. मात्र, अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी याचा पूर्णपणे इन्कार केला आहे. टाईम कॅप्सूल ठेवण्याची बाब देखील त्यांनी फेटाळून लावली आहे. तसेच राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर बाधण्यापूर्वी मंदिराच्या परिसरात दोन हजार फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवण्याच्या योजनेवर ट्रस्टचे सदस्य चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची असून त्यावर अशा वृत्तांवर ट्रस्टच्या अधिकृत विधानांची प्रतिक्षा केली पाहिजे, असं राय यांनी म्हटलं आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कोमेश्वर चौपाल यांनी टाईम कॅप्सूल संदर्भात हे वक्तव्य केलं होतं. त्यावर चंपत राय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

दर्शनाचा कालावधी वाढवला
अयोध्येत भगवान रामलल्लाच्या दर्शन कालावधीत देखील बदल करण्यात आला आहे. दर्शनाची वेळ एक तास आणखी वाढवण्यात आली आहे. अयोध्येत सकाळी दर्शनाची वेळ एक तासाने वाढवली आहे. त्यामुळे आता भक्तांना रामलल्लाचे दर्शन सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत घेता येणार आहे. विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजता पुन्हा दर्शन सुरु होणार आहे. सायंकाळी 6 पर्यंत दर्शन घेता येईल. यापूर्वी सकाळी 7 ते 11 या वेळेत भाविकांना दर्शन घेता येत होतं. राम मंदिराच्या बाधणीच्या हालचाल सुरु झाल्याने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरु आहे.