सोन्याचे ‘शेषनाग’, चांदीचे ‘कासव’, 5 नद्यांचं ‘जल’… राम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये आणखी काय-काय लागेल ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 5 ऑगस्टला राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन होणार आहे. यासाठी जोरात तयारी सुरू आहे. काशीच्या विद्वानांकडे अनुष्ठानची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भूमीपूजनाच्या दरम्यान पायामध्ये एक मन चांदीची शिळा स्थापित केली जाईल. चांदीची शिळा स्थापित करण्याची बातमी कळताच लोकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढत आहे की भूमिपूजनाच्या दरम्यान अजून कोणकोणत्या सामग्रीचा वापर केला जाईल?

काशी विद्या परिषदेचे मंत्री आणि बीएचयूच्या संस्कृत विद्या धर्म विद्याशाखा ज्योतिष विभागाचे प्राध्यापक पंडित रामनारायण द्विवेदी यांनी या विषयावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पायामध्ये पंच रत्न- पोवळे, पन्ना, नीलम, रुबी आणि पुष्कराज यांच्यासह बाबा विश्वनाथ यांना चढवलेले पाच चांदीचे बेलपत्र, पाच चांदीची नाणी टाकली जातील.

डॉ. द्विवेदी यांनी सांगितले की ही पाच चांदीची नाणी नंदा, जया, भद्रा, रिक्ता आणि पूर्णा यांचे प्रतीक असतील. ते म्हणाले की ताम्र कलशात पाच नद्यांचे पवित्र पाणी भरले जाईल, ज्याचा उपयोग विधींसाठी केला जाईल. काशी विद्या परिषदेच्या मंत्र्यांनी सांगितले की, पाताळ लोकचे स्वामी आणि पृथ्वीला आपल्या फणावर धारण करणाऱ्या शेषनागची प्रतिकृती देखील पायामध्ये टाकली जाईल.

बीएचयूच्या संस्कृत विद्या धर्म विद्याशाखा ज्योतिष विभागाचे प्राध्यापक द्विवेदी म्हणाले की शेष नागची प्रतिकृती सोन्याची असेल. सोबतच चांदीच्या कासवाची प्रतिकृती देखील भूमिपूजनामध्ये वापरली जाईल. त्यांनी सांगितले की श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून भूमिपूजनाचा विधी पार पाडण्यासाठी त्यांना औपचारिक निमंत्रण आल्याचे त्यांनी सांगितले.

काशी विद्वत परिषदेच्या मंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्यासह अन्य दोन विद्वानही राम मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी अयोध्येत जातील. ते म्हणाले की ते 3 ऑगस्टला अयोध्येत पोहोचतील. महत्त्वाचे म्हणजे 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट तयारीला अंतिम रूप देण्यास व्यस्त आहे, तर देशातील विविध ठिकाणाहून नद्यांचे पवित्र पाणी आणि माती आणण्याची प्रक्रियाही सुरू आहे.