‘झाडावर होता मोठा साप’, दीपिका चिखलिया यांनी सांगितला शूटींगचा ‘तो’ भयानक किस्सा

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनच्या काळात 33 वर्षानंतर ‘रामायण’ मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. प्रेक्षकांनी तितक्याच उत्साहाने ती पाहिली आहे. या मालिकेने पुन्हा अनेकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. मालिकेतील पात्र देखील पुन्हा एकदा चर्चेत होती. विशेष म्हणजे सीता हे पात्र साकारणार्‍या अभिनेत्री दीपिका चिखलीया. त्यांनी 33 वर्षानंतरही मालिकेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच त्यांनी असाच एक किस्सा सोशल मीडियाद्वारे सांगितला असून त्याच्या चर्चा सुरु आहेत.

दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो रामायण मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळीचा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यावेळी घडलेला किस्सा सांगितला आहे. ‘आम्ही शुटींगमध्ये व्यग्र होतो. कोणी डायलॉग आठवत होते, तर कोणी शांत बसले होते. नेहमी प्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु होते. सीन शूट करुन झाल्यानंतर आमचे कॅमेरामॅन अजित नाईक यांनी ती जागा खाली करण्यास सांगितली. त्या झाडाखाली उभे राहू नका असे त्यांनी म्हटले. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. हे आम्हाला असे का सांगतायेत? अजित यांनी सेटवरील इतर टेक्निशियन्सला देखील ती जागा खाली करण्यास सांगितले. आम्हा सर्वांना कळेना हे असे का बोलतायेत’ ‘सागर साहेबही आश्चर्यचकित झाले. त्यांनी अजितला विचारले काय झाले. त्यावर त्याने झाडावर बसलेल्या एका मोठ्या सापाकडे बोट दाखवले. त्यानंतर आम्ही सगळेजण जीव मुठीत घेऊन तेथून पळालो’ असे दीपिका यांनी पुढे म्हटले आहे. सध्या दीपिका यांची ही पोस्ट चर्चेत आहे.