एक कोटी रुपयांची खंडणी मागत रिव्हॉल्वर लावून धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी येथे २८ एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगून ५० लाख सतरा हजार रुपये घेत जमीनीच्या व्यवहाराची प्रक्रिया पुर्ण केली नाही. त्यानंतर पैसे परत मागितल्यावर आणखी एका व्यवहारासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. महिला व तिच्या पतीच्या डोक्याला पिस्तूल लावून पाच लाख रुपयांचा चेक लिहून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश शंकर धुमाळ (३५, वाळवेकर नगर पुणे सातारा रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नुसरत समीर इनामदार (३५, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मरीलॅंड रिएल्टर्स या कंपनीच्या मालक आहेत. त्यांची अविनाश धुमाळ याच्यासोबत ओळख होती. मुळशी येथे त्याच्या मालकीची २८ एकर जमीन आहे. त्या जमीनीत गुंतवणूक करण्यास सांगून त्याने इनामदार यांच्याकडून ५० लाख १७ हजार रुपये घेतले. मात्र जमीन व्यवहाराची कोणतीही प्रक्रिया पुर्ण केली नाही. त्यानंतर त्याला दिलेली रक्कम परत मागितल्यावर त्याने ती दुसऱ्या जमीन व्यवहारात गुंतविली असल्याचे सांगितले. त्यानंतर ती रक्कम व्याजासहित देतो असे सांगितले. मात्र ती रक्कम काही परत दिली नाही. तसेच याउपरही त्याला मुळशी येथे जमीन व्यवहार करायचा आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागत त्याने फिर्यादी व त्यांच्या पतीच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून जबरदस्तीने पाच लाख रुपयांचा चेक लिहून घेतला. त्यानंतर फिर्यादी इनामदार यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.