डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनानंतर देखील वादाची मालिका सुरूच !

लातूर : पोलीसनामा ऑनलईन – लातूरमधील अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूनंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. ट्रस्टमधील काही मंडळींनी निधनापूर्वी महाराजांचा छळ केला आहे असा आरोप अ भा शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केला आहे. लातूरच्या शिवा लिंगायत संघटनेनंही महाराजांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची करण्याची मागणी महाराजांनी अहमदपूर आणि हडोळती मठावर नेमलेल्या उत्तराधिकाऱ्यांना मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं 1 सप्टेंबर रोजी कोरोनामुळं निधन झालं. ते 104 वर्षांचे होते. 28 ऑगस्ट रोजीच ते समाधी घेणार असल्याची अफवा समोर आली होती. यानंतर त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथंच त्यांचं कोरोनामुळं निधन झालं. यानंतर शिवा वीरशैव लिंगायत संघटनेच्या मनोहर धोंडे यांनी असा आरोप केला की, भक्तीस्थळाच्या ट्रस्टींनी महाराजांचा नांदेडच्या रुग्णालयात जाऊन आतोनात छळ केला आहे.

यानंतर धोंडे यांची वाद निर्माण करण्याची पार्श्वभूमी समाजाला माहित असल्यानं समाधी अफवेमागे तेच असल्यानं त्यांची चौकशी करावी अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले मनोहर धोंडे ?

मनोहर धोंडे म्हणाले, “4 सदस्यांचं बहुमत करून ट्रस्टचे अधिकार घेण्यासाठी षडयंत्र, आप्पांना 7 पैकी 3 सदस्य बदलायचे. जिवंत समाधी घेऊन भावनिक ब्लॅकमेल करायचं आहे. आप्पांना ट्रस्टमधील लोकांनी भावनिक त्रास दिला आहे. मी याचा छडा लावणार. रामदास पाटीलसारख्यांना चॉकलेट देऊन माझ्यावर भुंकण्यासाठी सोडलं आहे. हॉस्पिटलमध्ये देखील त्यांना टॉर्चर केलं गेलं आहे. एका तासाच्या भेटीत हे टॉर्चर झालं आहे. ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्या 6 जणांनीच छळ केला आहे” असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.

काय म्हणाले रामदास पाटील ?

अहमदपूर भक्ती स्थळ ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पाटील म्हणाले, “धर्म, समाज तोडण्यात, बऱ्याचशा मठात वाद निर्माण करण्यात ते माहिर आहेत. इथं शिष्य म्हणून यावं. मी यात पाठपुरावा करेन. सायबर क्राईममधून डिटेल्स घ्यावेत. यांनी तिथं गोंधळ घातला. सत्य बाहेर येईल. या अनुषंगानं दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ऑन कॅमेरा जबाबही घेतला आहे. आप्पांनी कधीच समाधी घ्यायचं म्हटलं नाही. 28 तारखेला याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांचा गोंधळ आहे त्याचा तपास करावा. पर्यटन, हॉस्पिटल, गुरूकुल, गोशाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, उत्तराधिकारी यांना सोबत घेऊनच करेन. आप्पांची 50 कोटींची प्रॉपर्टी म्हणणंही चुकीचं आहे. आप्पांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा मिळेलच.” असंही ते म्हणाले आहेत.