PMC बँकेनंतर RBI नं घातली आणखी एका ‘सहकारी’ बँकेवर बंदी, काढता येणार एवढी रक्कम

बंगळुरू : वृत्तसंस्था – आरबीआयने पीएमसीनंतर आता आणखी एका बँकेवर पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले आहेत. बंगळुरूमधील श्री गुरू राघवेंद्र सहकारी बँकेच्या व्यवहारांमधील अनियमिततेमुळे त्यांच्यावर बंदी घातली आहे अशी माहिती आहे. या बँकेच्या ग्राहकांना फक्त 35 हजार रुपये काढता येणार आहेत.

आरबीआयने श्री गुरू राघवेंद्र सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत काही स्पष्ट केलेलं नाही मात्र या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 च्या कलम 35 अंतर्गत आरबीआयने ही कारवाई केली आहे. आता नव्या आरबीआयच्या आदेशामुळे राघवेंद्र सहकारी बँकेच्या ग्राहकांना कोणतंही नवीन कर्ज मिळणार नाही. पुढच्या सहा महिन्यांमध्ये बँकेत कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. याशिवाय ग्राहकांनाही खात्यातून केवळ 35 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे.

बंगळुरूमधील या बँकेचे 9 हजार ग्राहक आहेत. आरबीआयने याबाबत एक पत्रही वेबसाईटवर अपलोड केलं आहे. यात म्हटलं आहे की, 10 जानेवारी 2020 रोजी व्यवहार बंद झाल्यानंतर बँकेतून कोणतंही कर्ज किंवा अनुदान देता येणार नाही. प्रत्येक बचत आणि चालू खात्यातील रक्कम काढण्यासाठी 35 हजारांची मर्यादा घालण्यात आली आहे.

बँकेचे चेअरमन रामाकृष्णा यांनीही ग्राहकांना पैसे सुरक्षित असल्याचं म्हणत आश्वासन दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, श्री राघवेंद्र सहकारी बँकेत ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे.

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनीही ग्राहकांचे नुकसान होणार नसल्याचं आश्वसन दिलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सहकारी बँकेच्या ग्राहकांनी शांत रहावं. ग्राहकांनी काळजी करू नये. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. ग्राहकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे.” असेही सर्या यांनी सांगितले.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/