अजोबा अन् वडिलांचे छायाचित्र हटवले, ‘तानाशाह’ किम जोंग उनच्या ‘प्रकृती’ बाबत पुन्हा ‘चर्चा’

प्योंगयांग :  वृत्तसंस्था –  उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन यांचे आजोबा आणि वडिलांचे मोठी पोस्टर प्योंगयांग येथील किम इल सुंग चौकातून काढण्यात आली आहेत. या घडामोडीनंतर किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. या ठिकाणी किम यांच्या पोस्टरसाठी जागा तयार करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, उत्तर कोरियातील परंपरेनुसार जिवंत असलेल्या नेत्याचा पुतळा, पोर्ट्रेट तयार करता येऊ शकत नाही.

किम जोंग उन यांचे आजोबा किम इल सुंग आणि किम जोंग इल यांची मोठी पोस्टर प्योंगयांग येथील चौकात लावण्यात आली होती. एका वृत्तवाहिनेने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार ही पोस्टर अचानकपणे काढून टाकण्यात आली. त्यामागचे नेमके कारण कोणालाही माहित नाही. पत्रकार रॉय कॅली यांनी दिलेल्या माहितीनुसार किम जोंग इल यांचा पुतळाही हलविण्यात आला आहे, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

किम इल सुंग चौकाचे यापूर्वी 2012 मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. किम जोंग इल यांच्या मृत्यूनंतर या चौकाचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता येथून त्यांचे पोर्ट्रेट हटविण्यात आल्याची घटना उत्सुकता वाढवणारी आहे. तसेच येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. या शिवाय चौकाच्या पश्चिम बाजूनं वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोरियातील परंपरेनुसार जिवंत असलेल्या नेत्याचा पुतळा किंवा पोर्ट्रेट तयार करता येऊ शकत नाही. यामुळे किम जोंग उनच्या प्रकृतीच्या चर्चांना उधाण आले आहे.