लोकल सुरू करण्यास ठाकरे सरकार तयार, ‘या’ मंत्र्याचा पियुष गोयल यांच्यावर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकलबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप करत, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘मुंबईतील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकलसेवा सुरु करावी,’ अशी मागणी केली आहे. ते वार्ताहरांशी बोलत होते.

‘मिशन बिगेन अंतर्गत’ राज्य सरकार अनेक गोष्टी सुरु करत आहे. रविवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर मोनो रेल तर आजपासून मुंबई मेट्रो सुरु झाली आहे. त्याचं अनुषंगाने लवकरच नियमित लोकलसेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकार परवानगी देईल, अशी अपेक्षा नवाब मलिक यांच्या प्रतिक्रियेनंतर निर्माण झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले, राज्य सरकारने सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिली असून रेल्वेने तशी अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे नमूद करतच ‘मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरु करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरु करावी,’ अशी मागणी त्यांनी केली. तर एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे लोकल सेवा करण्यास आम्ही तयार आहोत मात्र राज्य सरकार परवानगी देत नाही, असे म्हणतात आणि दुसरीकडे राज्य सरकारने परवानगी देताच महिलांसाठी लोकलची दारे खुली करण्यात येत नाहीत, याचा अर्थ काय घ्यावा ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार लोकलच्या संदर्भात राजकारण करत असल्याचा आरोप करतानाच नियमित लोकल सेवा सुरु करा, जादा गाड्या सोडा. गर्दी होऊ नये त्यासाठी अतिरिक्त सेवा सुरु करा. गरज भासल्यास महिलांसाठी विशेष लोकल सोडा, अशा मागण्या नवाब मलिक यांनी केल्या. यापार्श्वभूमीवर एका मंत्र्याने लोकलबाबत या मागण्या केल्याने लोकलसेवा लवकरच सुरु होण्यास राज्य सरकारची हरकत नसल्याचे संकेत मिळत आहेत.