PM Care फंडातील निधीचे काय केले ?, अभिनेत्रीचा मोदी सरकारला ‘सवाल’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे परराज्यात अडकून पडलेल्या कामगारांना गावी नेण्यासाठी रेल्वे तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन सत्ताधारी अणि विरोधक एकमेकांवर टीका करीत आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करुन मजुरांचे ट्रेन तिकिटांचे पैसे काँग्रेस भरणार असल्याचे जाहीर केले आहे. लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणावर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने पीएम फंडातील निधीचे काय केले अशी विचारणा मोदी सरकारला केली आहे.

मजुरांच्या रेल्वे तिकिटांचे पैसे विरोधी पक्ष का देणार आहे? सहाय्यता निधी आणि टॅक्समार्फत जमा होणार्‍या पैशांचे काय झाले? अशा आशयाचे ट्विट रिचा चड्ढा हिने केले आहे. या ट्विटमार्फत तिने सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. रिचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणार्‍या विविध घडामोडींवर ती व्यक्त होताना दिसते. या पार्श्वभूमीवर तिचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. स्थलांतरित मजुरांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. कामगार आणि मजूर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे दूत आहेत. जेव्हा आपले सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोफत हवाई प्रवासाची व्यवस्था करते, गुजरातमधल्या एका कार्यक्रमासाठी वाहतूक आणि भोजनासाठी 100 कोटी रुपये खर्च करते, रेल्वे मंत्रालयाकडून पीएम कोरोना फंडाला 151 कोटी रुपयांची देणगी दिली जाते, मग प्रगतीचे दूत असलेल्या स्थलांतरित मजुरांना या कठिण काळात मोफत रेल्वे प्रवास का करु दिला जात नाही असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे.