निर्भया केस : दोषींची फाशी टळल्यानंतर ऋषी कपूर यांनी केलं Tweet, लोक म्हणाले – ‘एकदम बरोबर’

नवी दिल्ली : निर्भया केसमधील नराधमांची फाशी सोमवारी (दि 2 मार्च 2020) पुन्हा एकदा टळली. पटीयाला हाऊस कोर्टानं पुढील आदेशापर्यंत फाशीवर स्थगिती दिली आहे. निर्भयाच्या दोषींची फाशी टळण्याची ही तिसरी वेळ आहे. दोषी पवन गुप्तानं अंतिम क्षणात राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. सोमवारी त्यानं ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या छत्तीसगढच्या दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतरच यावर निर्णय दिला जाईल. सोमवारी पवननं दया याचिका दाखल केल्यानंतर या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.

ऋषी कपूरनं केलं ट्विट

या प्रकरणी आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलं आहे. निर्भयाच्या दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळल्यानं ऋषी कपूर देखील नाराज आहेत. अभिनेता सनी देओलच्या दामिनी सिनेमातील एक डायलॉग लिहित त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत ऋषी कपूर म्हणतात, “निर्भया केस. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. दामिनी. हे खूप हास्यास्पद आहे.” ऋषी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध विषयावर आपलं मत ते बिंधास्तपणे मांडत असतात.

ऋषी कपूर यांच्या या ट्विटचं अनेकांनी समर्थन केलं आहे. ऋषी कपूर एकदम बरोबर बोलत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी त्याचं ट्विट शेअर केलं आहे तर काहींनी यावर कमेंट केली आहे.