रितेशला बनवायचाय विलासराव देशमुखांचा ‘बायोपिक’, दाखवायचाय ‘सरपंच ते मुख्यमंत्री’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकाच दौर सुरू आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या बायोपिकमध्ये आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचं नाव अ‍ॅड झालं आहे ज्यानं बायोपिकबद्दल इच्छा बोलून दाखवली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे रितेश देशमुख. रितेश देशमुखला त्याचे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवण्याची इच्छा आहे. रितेश यासाठी एका स्टोरीच्या शोधात आहे. रितेश आपला आगामी सिनेमा बागी 3 च्या प्रमोशनमध्ये बोलत होता. यावेळी त्यानं बायोपिकबद्दल सांगितलं. बागी 3 हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.

याबाबत माहिती देताना रितेश म्हणतो, “माझ्या वडिलांचा प्रवास हा चमत्कारिक प्रवासापैकी एक आहे. त्यांनी सरपंच म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री झाले. अनेकांनी त्यांच्यावर कथा लिहिल्या. मला दाखवल्या. मात्र यावर सिनेमा बनवणं सोपं नाही.”

पुढे बोलताना रितेश देशमुख सांगतो, “जेव्हा एखादा विषय तुमच्या काळजाच्या जवळचा असतो तेव्हा तुम्ही वस्तुनिष्ठता विसरता. समजा मी त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवला तर लोका मला म्हणू शकतात की, मी त्यांचे फक्त चांगलेच गुण दाखवले आहेत. आयुष्यातील इतर पैलू दाखवले नाहीत असंही कोणी म्हणू शकतं. जर कोणी दुसऱ्यानं सिनेमात काही दाखवलं तर मी म्हणू शकतो की ते असे नव्हते ते तसे होते. बायोपिकमध्ये लोकांच्या मतांमध्ये फरक असू शकतो.”

रितेश म्हणतो, “असं असलं तरी कधी तरी मी माझ्या वडिलांच्या आयुष्यावर सिनेमा नक्की बनवेन. जेव्हा आपण पुस्तक लिहतो तेव्हा 500 पानंही लिहू शकतो. परंतु 2 तासांच्या सिनेमात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पैलू दाखवणं खूप अवघड आहे. जर तुम्ही यात फेल झाला तर बायोपिक कंटाळवाणा होतो.”