आ. रोहित पवारांकडून PM मोदींचे ‘कौतुक’, राज्यातील भाजप नेत्यांना ‘ही’ जाणीव करून द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसात देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रात केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ( NCP MLA Rohit Pawar) केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. मात्र, याचवेळी कोरोनावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यावर आ. पवार यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

आ. पवार यांनी राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांना कोरोनाची जाणीव करुन देण्याची मागणी केली. ते म्हणाले, कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन मोदीजींनी जी 20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपाच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील, असे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यात 17 लाख 74 हजार 455 कोरोनाचे रुग्ण
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 5 हजार 460 रुग्णांचे निदान झाले असून 62 मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 17 लाख 74 हजार 455 झाली असून बळींचा आकडा 46 हजार 573 झाला आहे. दिवसभरात 4 हजार 88 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, आतापर्यंत 16 लाख 47 हजार 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.82 टक्क्यांवर पोहोचले आहे.