दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे रोहित पवार यांनी मागितली मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लॉकडाउन असल्यामुळ ेजीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीशिवाय कुणालाही घराच्या बाहेर पडणे शक्य नाही. बाहेरगावी असलेल्या अनेकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यांच्या अडचणी समजताच आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे लाखो लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकले आहेत. कामानिमित्ताने परराज्यात किंवा जिल्ह्यात राहणार्‍या कामगारांबरोबरच शिक्षणामुळे राहणार्‍या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत जातात. मात्र, लॉकडाउनमुळे हे विद्यार्थी दिल्लीतील वेगवेगळ्या भागात अडकले आहेत. यातील एका विद्यार्थ्यांने ट्विट करून मदत मागितली होती. ट्विटची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. करोल बाग, मुखर्जी नगर, हैदरपूर या भागात हे विद्यार्थी असून त्यांना जेवणासह जीवनावश्यक वस्तुंसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश विद्यार्थी समाजातील मागासलेल्या घटकातील असून, त्यांना सर्व सोयी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती रोहित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांना केली आहे.