‘रॉ’चे प्रमुख नेपाळच्या दौऱ्यावर, देशातील प्रमुख नेत्यांबरोबर पंतप्रधानांशी 2 तास गुप्त चर्चा

काठमांडू : वृत्तसंस्था – भारत ( India ) आणि चीन ( China) सीमेवर मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये ( Nepal) महत्त्वपूर्ण हालचाली घडत आहेत. भारताच्या रिसर्च अँण्ड अ‍ॅनालिसिस विंग म्हणजेच रॉ ( RAW) या संस्थेचे प्रमुख सामंत कुमार गोयल ( Samant Kumar Goyal) यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा ( K.P.Oli.Sharma ) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी ही भेट झाली असून यासाठी रॉ चे एक विशेष पथक विमानाने बुधवारी काठमांडूला गेले होते. याठिकाणी ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांच्याशी ‘रॉ’च्या प्रमुखांनी दोन तास गुप्त चर्चा केली. या भेटीसंबंधी कोणताही तपशील समोर आला नसून भारताकडून ही केवळ एक औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु य भेटीवरून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरु झाला आहे. या भेटीचा तपशील जाहीर करण्याची नेपाळचे तीन माजी पंतप्रधान आणि के.पी. ओली यांच्या पक्षातील नेत्यांनीच मागणी लावून धरली आहे. रॉ प्रमुख आणि के.पी. ओली बुधवारी रात्री चर्चेसाठी बसले होते. ही बैठक मध्यरात्रीपर्यंत सुरु असल्याचे कळते. विशेष म्हणजे या सर्व भेटीगाठी आणि बैठकीदरम्यान नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे या बैठकीत नक्की काय घडले याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. भारत आणि चीनमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावामध्ये नेपाळची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. देशातील विकासकामांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी पुरवून चीन नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल ( Pushpa Kamal Dahal) प्रचंड हे चीनधर्जिणे मानले जायचे. त्यांच्या काळात भारत आणि नेपामधील संबंधामध्ये दुरावा आला होता. त्यामुळे रॉ प्रमुख आणि के.पी. ओलींच्या या भेटीत काय चर्चा झाली याकडे सर्वांची नजर लागून आहे.

दरम्यान, लवकरच भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे ( M.M.Naravne) नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण बदल केले होते. ओली यांनी सरकारमधील उपपंतप्रधान असलेले ईश्वर पोखरेल ( Ishwar Pokhrel) यांच्याकडून संरक्षणमंत्रीपद काढून घेतले होते. आता स्वत: ओली संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे आता नरवणे यांच्या दौऱ्यात देखील काय चर्चा होणार आणि याचा भारताला काय फायदा होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like