उत्तर कोरियाचे ‘तानाशाह’ झाले ‘प्रकट’, किंग जोंग उन यांना रशियानं थेट ‘वॉर’ मेडलनं केलं ‘सन्मानित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागच्या आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल अनेक बातम्या आल्या होत्या. काहींनी तर किम यांचा मृत्यू झाला किंवा त्यांचा ब्रेन डेड झाला असे जाहीर केले. पण २० दिवसानंतर किम समोर आल्याने सगळेच जण हैराण झाले होते. आणि आता त्यांना रशियाने वॉर मेडलच जाहीर केले आहे.

नाझी जर्मनीवर विजय मिळवल्याला ७५ वर्षे झाली. त्यामुळे या युद्धाच्या आठवणींच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी किम जोंग यांना अगदी वॉर मेडल देऊनच सन्मानित केले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरोधात सोव्हिएत युनियनच्या सैनिकांच्या हौतात्म्यप्रित्यर्थ वॉर मेडल देण्यात आले असल्याची माहिती उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमधील रशियन दुतावासाने मंगळवारी दिली.

आज उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री सोन ग्वोन यांना प्योंगयांगमधील रशियन राजदूत अलेक्झांडर मॅटसेगोरा यांनी हे पदक दिले. मागच्या महिन्यापासून किम यांची प्रकृती ठीक नसल्याचे म्हटले जात होते. पण ते व्यवस्थित असल्याचा व्हिडीओ जारी करण्यात आला. आज प्योंगयांगमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित नव्हते. तसेच रशिया आणि उत्तर कोरियाचे अधिकारी मास्क घालून उपस्थित होते. दरम्यान कोरियाने त्यांच्या देशात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचा दावा केला होता.

कोरोनाने थांबवली दुसऱ्या महायुद्ध विजयाची परेड

जगात पहिल्यांदाच कोरोनामुळे सर्व गोष्टी थांबल्या असून दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली आहेत. यासाठी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या परेडला किम यांना देखील बोलावण्यात आले होते. पण पुतीन यांनी कोरोनामुळे परेड पुढे ढकलली आहे.