सदाभाऊंची पवारांवर टीका, म्हणाले – ‘…नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते नव्हे तर विश्वासघातकी राजे’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार तुम्ही जास्त खोटं बोलू नका, नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊ गेलात असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.

सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांचं मनावर घेऊन नका. ते नेहमी उलटं बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल नेमका तो दुसऱ्या बाजूनं उगवतो. शरद पवारांनी आत्मचरित्रातही तसं लिहून ठेवलं आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे. मार्केट कमिटीत मालाच्या विक्री संदर्भात हे विरोध करतात. परंतु हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देतात अशी टीका त्यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली आहे. येत्या 24 डिसेंबर पासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली आहे. इस्लामपूर येथे एका जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.