वाट चुकलेल्या पर्यटकांना देवदूत भेटला !

पौ़ड : पोलिसनामा ऑनलाईन – मुळशी तालुक्यातील तैलबैला घाटात वाट चुकलेल्या कोल्हापूरच्या २५ पर्यटकांची पोलीस पाटील गणेश अनंत मेणे यांच्या सतर्कतमुळे सुटका झाली. घनदाट जंगलात सैरभैर झालेल्या या पर्यटकांना मेणे यांनी कोकणातील आपल्या नातेवाईकांमार्फत सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचविले . दरम्यान मेणे यांनी केलेल्या कामाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

कोल्हापूर येथील जयेश पाटील यांच्यासह २५ पर्यटक किल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी आले होते. त्यात पाच लहान मुलांचाही समावेश होता. शुक्रवारी (दि २०) सायंकाळी हे पर्यटक तैलबैला घाटातून कोकणात पालीच्या दिशेने निघाले होते. परंतू घाटात ते वाट चुकल्याने सैरबैर झाले. मोबाइलला रेंज नसल्याने सर्वच जण घाबरले. रस्ता मिळत नव्हता, फोनही बंद, कोणीही दिसत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे कोणालाही कळत नव्हते. अखेर वाट शोधत असताना एके ठिकाणी त्यांना फोनला रेंज मिळाली.त्यांनी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधला. अधिक्षक कार्यालयातून ही माहिती पौड पोलिसांना दिली गेली. पोलिस नाईक संजय सुपे यांनी तैलबैलाचे पोलिस पाटील गणेश मेणे यांना याबाबत कळविले. त्यावेळी रात्री सव्वासात वाजले होते. मेणे यांनी जयेश पाटील यांना फोन करून तुम्ही तिथेच थांबा कुठे जावू नका, असे सांगत धीर दिला.

तैलबैला घाटातून उतरून पर्यटकांपर्यंत पोचण्यास खूप अंतर होते.रात्रही झाली होती त्यामुळे मेणे यांनी जयेश पाटील यांचा कोकणातील कोंडगावचे मित्र लक्ष्मण बावधने यांच्याबरोबर मोबाईल कॉन्फरन्सवरून संपर्क साधून दिला. बॅटरीच्या प्रकाशाच्या माध्यमातून बावधने यांनी पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू तो झाला नाही. वेळ जात होता मात्र मदत काही पोहोचत नव्हती. त्यामुळे पर्यटक भेदरले. दरम्यान पुन्हा मेणे यांच्याशी संपर्क केला. मेणे यांनी कोकणातीलच ठाणाळ्यात राहणारे नातेवाईक अर्जून चिंधू मेणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ठाणाळ्याच्या घाटात पर्यटकांना शोधण्याची विनंती केली. त्यावेळी अर्जून, रमेश चिंधू मेणे आणि रामा जाणू वाघमारे हे तिघेजण रात्री नऊच्या सुमारास ठाणाळ्यातून घाटाच्या दिशेने निघाले.

जंगलात पर्यटकांना शोधणे मेणे बंधूंपुढे आव्हान होते. ठाणाळ्याच्या घाटातील जंगलात बॅटरीचा प्रकाश आणि पर्यटकांनी मोठ्या आवाजात दिलेल्या घोषणांचा मेणे बंधूंनी कानोसा घेतला. त्याच दरम्यान अडकलेले पर्यटकही सैरबैर चालत होते. ते ठाणाळ्याच्या कड्याच्या दिशेने निघाले होते. परंतू मेणे यांच्या आवाजामुळे ते मागे फिरले त्यांनीही जय भवानी, जय शिवाजीच्या मोठ्याने घोषणा दिल्या. बॅटरीचा प्रकाश सभोवताली फिरविला. फटाके वाजविले. आवाज आणि बॅटरीच्या प्रकाशामुळे रात्री अकरा वाजता भरटकलेल्या पर्यटकांना भेटण्यात मेणे बंधूंना यश आले. त्यानंतर सर्वजण ठाणाळे गावच्या दिशेने आले. रात्री एक वाजता सर्वजण गावात पोहोचले.त्यानंतर अर्जुन मेणे यांनी पोलीस पाटील गणेश मेणे यांच्याशी संपर्क साधून सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे सांगितले.

मेणेच्यारूपाने देवदूत अवतरला
जीवघेण्या कड्याच्या दिशेने जाणाऱ्या, घाबरलेल्या पर्यटकांना अर्जून आणि रमेश मेणे यांनी सर्व पर्यटकांना रात्री घरी नेले. मध्यरात्रीच्यावेळी त्यांना जेवण देत . मुक्कामाची व्यवस्थाही केली . दुसऱ्या दिवशी पर्यटकांनी मेणे बंधूंचे आभार मानले. तर गणेश मेने यांना फोन करून तुम्ही साक्षात देवदूतासारखे धावून आल्यामुळेच आम्ही वाचलो, अशा भावना व्यक्त केल्या. मेणेच्या रूपात देवदूत अवतरल्याने मोठी दुर्घटना टळली.