Coronavirus : समुद्रात अडकून पडलेल्या ‘त्या’ खलाशांना दिलासा

पोलीसनामा ऑनलाइन –  गुजरात राज्यातील पोरबंदर, वेरावळ इत्यादी भागात मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करणार्‍या सुमारे एक हजार नागरिकांना दक्षिण गुजरातमधील स्थानिक मच्छीमारांनी बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र, गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नागोळ व उमरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अरबी समुद्रात अडकून पडलेल्या गुजरातमधील खलाशांना नागोळ-उंबरगाव दरम्यान बंदरात उतरवण्यात येत आहे. दक्षिण गुजरात भागातील अनेक तरुण हे खलाशी म्हणून अन्य भागांमध्ये कामानिमित्त जात असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने हे खलाशी पुन्हा आपल्या घराकडे निघाले आहेत. दक्षिण गुजरातमधील नागोळ व लगतच्या मासेमारी बंदरावर स्थानिकांनी या मंडळीला उतरण्यास मज्जाव केला होता. प्रत्येक बोटीवर शेकडो खलाशी एकत्रित प्रवास करीत असून गुजरातमध्ये शक्य न झाल्यास महाराष्ट्रातील झाई बंदरावर उतरण्याचे त्यांचे नियोजन होते. याबाबत पालघर जिल्ह्यातील मच्छीमार नेत्यांनी पालघरच्या जिल्हाधिकारी यांना सुचित केल्यानंतर त्यांनी डहाणू तालुक्यातील महसूल अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत गुजरात राज्यातील शासकीय विभागाने मध्यस्थी केल्यानंतर या खलासी मंडळीना नारगोळ-उमरगाव खाडीत उतरवण्यात येत असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली. या सर्व खलाशांचे अलगीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. या खलाशांमध्ये तलासरी तालुक्यातील काही तरुण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.