‘सामना’तून उदयनराजेंचा ‘अपमान’ नाही ! ते आपला माणूस, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात गैर काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजे भोसलेंवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधत उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर टीका केली. आता उदयनराजेंना शिस्त लागली आहे, भाजपात कॉलर उडवणे जमत नाही, असा खोचक चिमटा सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आला. सामनाच्या अग्रलेखावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. परंतू उद्धव ठाकरे यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले.

शिवसेनेने उदयनराजेंना समज देताना ते म्हणाले की, शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्ता आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपाच्या शिस्तीत बसत नाहीत. पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा. पण, याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या राजांना दिली असेल.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सामनामधील अग्रलेख हा शुद्ध मराठीत आहे. त्यामध्ये कुठेही उदयनराजेंचा अपमान करण्यात आला नाही. उदयनराजे आपला माणूस आहे. त्यामुळे आपल्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवण्यात गैर काय?