चीनला ‘दूर’ करत SAMSUNG ची भारताला ‘पसंती’, करणार 5367 कोटींची गुंतवणूक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – फोननिर्मिती क्षेत्रातील जगभरातील अव्वल कंपन्यांपैकी एक असणार्‍या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ दक्षिण कोरियन कंपनी असणार्‍या सॅमसंगने उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले बनवण्याचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील करारांवर 2019 च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षर्‍या झाल्या आहेत.

संबंधित प्रकल्प चीनमध्ये उभारण्याचा विचार बदलत कंपनीला आकर्षक कर सवलती आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्याने कंपनीने भारताला पसंती दिल्याचे सांगण्यात येत आहे. या कारखान्याच्या माध्यमातून 1 हजार 300 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणार्‍या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचे काम करणार्‍या खात्याने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प 2021 पासून सुरु होणार आहे.

इन्व्हेस्ट इंडियाच्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही उत्तर प्रदेशमधील हायटेक उद्योगांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी आणि मुख्य गुंतवणूकदार म्हणजेच सॅमसंग डिस्प्लेचे कामकाज भारतात सुरु करण्यासाठी देता येतील अशा सोयींसंदर्भात आमच्या शिफारसी सादर करीत आहोत. 20 वर्षांच्या कालावधीत एकूण गुंतवणूकीवर उच्च भांडवली प्रोत्साहन मिळवून सॅमसंगला फायदा होऊ शकेल असंही इन्व्हेस्ट इंडियाने पत्रात म्हटले आहे.