लाचखोर उद्यान पर्यवेक्षकाला 75 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 75 हजारांची लाच घेताना उद्यान पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 31) दुपारी एसीबीने सांगली महापालिकेच्या उद्यान विभागातच ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे (वय 57) असे अटक केलेल्या उद्यान पर्यवेक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कंत्राटदाराने सांगली महापालिकेचे काम घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढण्यासाठी कोरे यांनी त्या कंत्राटदाराकडे 75 हजाराची लाच मागितली होती. याबाबत संबंधित कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार कंत्राटदाराच्या तक्रारीची विभागाने पडताळणी केली. कोरे यांनी 75 हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी उद्यान विभागाच्या कार्यालयातच लाच घेताना कोरे यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, धनंजय खाडे, राधिका माने, सीमा माने, आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.