मोठा अनर्थ ! महाराष्ट्रात ‘या’ शहरात दारुच्या बॉटल्समध्ये ‘सॅनिटायझर’, मार्केटमधील साठा परत मागवण्याचे आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला दुर ठेवण्यासाठी नागरिकांना आपले हात ठरावीक अंतराने साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सॅनिटायझरला मागणी वाढल्याने सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागला आहे. दरम्यान, नागपूरमधील रॉयल ड्रिंक्स या वर्धमाननगर येथील मद्य कारखान्याला सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांनी चक्क दारूच्या बॉटल्समध्येच सॅनिटायझर भरून विकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर काही मद्यपींनी याचे मद्य समजून सेवन केले असल्याचे पुढे आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने साठा विक्रीवर प्रतिबंध घातला असून मार्केटमधील साठा परत बोलावण्यासाठी संबंधित कारखाना मालकांना निर्देश दिले. सॅनिटायझरचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पढील तपास सुरु करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागल्याने सरकारने मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिली. वर्धमाननगर येथील प्रमोद जयस्वाल यांच्या रॉयल ड्रिंक्स या कारखान्याला परवानगी मिळाल्याने त्यांनी सॅनिटायझर निर्मितीला सुरुवात केली. मात्र, त्यांनी सॅनिटयझर बनवताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. इतर सॅनिटायझरच्या बॉटल्सप्रमाणे सॅनिटायझरच्या बॉटल्स बनविणे गरजेचे होते. मात्र, चक्क दारूच्या बॉटल्समध्ये तयार केलेले सॅनिटायझर भरण्यात आले. त्यावर असलेले झाकण देखील दारूनच्या बाटली सारखे असल्याने नेमकी दारूची बाटली आहे की सॅनिटायझरची बाटली आहे हे ओळखणे कठीण झाले आहे.

कारखान्यातून या बॉटल्स विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवण्यात आल्या. त्यामुळे आता नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेत उर्वरीत साठा विकण्यासाठी प्रतिबंधित केले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहआयुक्त प्रकाश शेंडे यांनी सांगितले.

दरम्यान, ह्या बॉटल्स कोणकोणत्या भागात विकण्यात आल्या आहेत याचा शोध घेण्यात येत आहे. रॉयल ड्रिंक्सच्या बाटल्या तुम्हाला कोठे आढळून आल्या तर त्या पिऊ नका, आरोग्यासाठी घातक असू शकतात असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या बाटलीचे पॅकिंग सॅनिटायझरच्या बाटली सारखे नसल्याने मद्य समजून पिण्याचा धोका वाढला आहे. 90 आणि 180 मिलिलिटरच्या बाटल्या बनविण्यात आल्या असून अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांनी दिली.