‘जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही शिवसेनेची भूमिका’ ; मराठा आरक्षणासंदर्भात संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाचे ( Maratha reservation) प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे, सरकार त्यावर निर्णय घेईल, यावर बोलणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाची भूमिका होती की जातीच्या आधारावर आरक्षण नको, कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, आर्थिक निकषावर आरक्षण हवे ही शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

कॉमेडियन कुणाल कामराच्या मुलाखतीत राऊत यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले की, मुस्लिमांमध्ये कोणी मागासवर्गीय असेल त्यांनाही आरक्षण मिळायला हवे. मराठा समाजात कोणी मागास असेल, तर त्यांना आरक्षण मिळावे. इतकच नव्हे तर दलितांमध्ये जे कोणी वर्षानुवर्षे आरक्षण घेऊन उच्चपदावर पोहाेचलेत त्यांनी आरक्षण सोडायला हवे. पोटाला जात आणि धर्म नसतो. जातीयवाद संपवावा हे आम्हाला वाटते, पण संपवणार कोण? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

विरोधकांचा आवाज दडपण्याचं काम केलं नाही
कोरोना हे असं संकट आहे, ज्याचा कोणी विचार केला नव्हता. विरोधकांचा आवाज बंद करा, टीका करू नका हे कधीच बोलणार नाही, विरोधक 10 टीका करतात, त्यातील 3 गोष्टी खऱ्याच असतात, त्याचा विचार करायला हवा. कोरोना काळात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोविड सेंटर, डॉक्टर्स सगळे सुरू आहे. एक मुख्यमंत्री आणखी काय करू शकतो. महाराष्ट्रात मृत्युदर कमी झाला, प्रत्येक राज्याने आपापल्या परीने काम केले. जेव्हा संकट असत तेव्हा पंतप्रधान आमचे नेते असतात, तो जे निर्णय घेतील तो मान्य केला जातो, अशा स्थितीत राजकीय विचार न करता काम केले पाहिजे, असे राऊत म्हणाले. राजकारणात कोणी दुश्मन नाही, विचारधारा वेगळी असू शकते. शरद पवार आमच्याविरोधात होते, तरीही आम्ही भेटत होतो, संधी मिळेल तेव्हा सर्व राजकीय नेत्यांना मी भेटतो, देवेंद्र फडणवीस आमचे दुश्मन नाहीत. त्यांच्यासोबत काम केले आहे, राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना स्थान मिळेल, विरोध होत असतो; पण तलवारी काढून विरोध होत नाही. मी मुलाखतीसाठीही फडणवीसांना भेटलो, असा खुलासा राऊत यांनी केला.

…वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते !
अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्त्वाचे असते. मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, स्टुडिओपण अनधिकृत आहेत, एक फिल्मी डायलॉग आहे “जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते.” त्यामुळे आमच्याकडे दगड (पत्थर) आहेत ते बाहेरून फेकू शकतो आणि आतमधूनही फेकू शकतो. जर तुम्ही काही चुकीचे केलं असेल तर गप्प बसावे काही चुकीची काम लपवण्यासाठी गप्प बसावे, आमच्यावर दगड फेकू नयेत, आम्ही तुम्हाला अनेकदा मदत केली आहे, असा इशारा राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला आहे.