Sanjay Raut On Adarsh Housing Society scam | ‘आदर्श’ घोटाळ्यावरून संजय राऊत यांचे टीकास्त्र, भाजपाचा राजकीय कुंटणखाना आता बंद होणार!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Adarsh Housing Society scam | भाजपाने आदर्श घोटाळ्याचा आरोप असलेले नेते अशोक चव्हाण यांना प्रवेश दिल्यानंतर भाजपावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विरोधी पक्षातील नेते एका पाठोपाठ एक भाजपामध्ये जात असल्याने आजच्या ‘सामना’तील रोखठोक सदरातील ‘राम लहर संपली! आता रामनाम सत्य है!’ असा मथळा असलेल्या लेखात संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, २०१४ च्या निवडणुकीत ज्या मोठ्या घोटाळ्यांवर भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेरलं त्या सगळ्यांचे सूत्रधार आज भाजपाच्या तंबूत आहेत. छगन भुजबळ, महाराष्ट्र घोटाळा, अजित पवार, सिंचन आणि शिखर बँक घोटाळा, अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा. या तिन्ही नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस आणि सोमय्यांसारखे नेते करत होते. त्यांचा हा खोटेपणा उघड पडला आहे.

भाजपाच्या पायाखाली जमीन राहिलेली नाही. सत्य आता उघड झालं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चारशे पार जाऊ हा मोदींचा बुडबुडा फुटला आहे. नांदेडची एक जागा जिंकण्यासाठी मोदींना शहिदांचा अपमान करणाऱ्या अशोक चव्हाणांना भाजपात घ्यावं लागलं. जिंकण्याची इतकी खात्री असती तर भाजपाने त्यांच्या राजकीय कुंटणखान्याचा असा विस्तार केला नसता.

लेखात संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, एकेकाळी महाराष्ट्र पुरोगामी विचार व विचारांवरील निष्ठेसाठी ओळखला जात असे. आज महाराष्ट्र बेईमानी, राजकीय बेडुक उड्या व घसरलेल्या राजकीय संस्कृतीसाठी ओळखला जात असेल तर या घसरणीस फक्त भाजपा जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गुळण्या टाकण्याचे काम भाजपा करत आहे.

अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडताना राऊत यांनी म्हटले आहे की, ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे व ज्यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेसच्या विचारांवर पोसले गेले ते अशोक चव्हाणही काँग्रेस सोडून भाजपावासी झाले. काँग्रेसच्या राजकारणातला सुसंस्कृत चेहरा म्हणून ते ओळखले गेले, पण ईडी कारवाईच्या भयाना त्यांना काँग्रेस सोडून भाजपात जावं लागलं.

मुंबईतल्या कफ परेड भागात असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने ३२ माळ्यांचा एक आलिशान टॉवर उभा राहिला. ज्याची मूळ संमती पाच माळ्यांची होती. पण त्यावर भ्रष्टाचाराचा एक, एक माळा चढवत गेले. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी त्या इमारतीत फ्लॅट्स घेतले.

अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाचे चार ते पाच फ्लॅट्स इमारतीत होते. कारगीलच्या शहिदांच्या कुटुंबांसाठी राखीव असलेली ही आदर्श इमारत म्हणजे भ्रष्टाचार आण शहिदांचा अपमान असल्याची बोंब तेव्हा भाजपाने मारली. या प्रकरणात अनेकांना तुरुंगात जावे लागले.

देवेंद्र फडणवीस आदर्श भ्रष्टाचारावर तापलेल्या तव्यावरील वाटण्यासारखे ताडताड करताना महाराष्ट्राने पाहिले. मात्र आता हा वाटाणा शांत झाला. अमित शाह, नरेंद्र मोदी यांनीही या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनीच अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. इतका खोटारडेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्यात भाजपाने गेल्या काही काळात घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत, अशी टीका राऊत यांनी फडणवीस आणि भाजपावर केली आहे.

या लेखात पुढे म्हटले आहे की, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय व्याभिचाराची कल्पना कुणालाच येऊ दिली नाही. अशोक चव्हाणांना फोडल्याने काँग्रेसचे किती नुकसान झाले ते सांगता येणं कठीण आहे, पण भाजपाची उरलीसुरली इज्जतही मातीमोल झाली.

अशोक चव्हाण लीडर नसून डीलर आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती. त्याच डीलरशी फडणवीसांना डील करावं लागलं. चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपाला अनैतिकतेचे सूतक लागले व ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.

मुंबईतील भाजपा नेते आशिष शेलार यांना पत्रकारांनी चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते प्रश्नकर्त्यावरच भडकले. मी तुम्हाला उत्तर देणार नाही असं सांगून पळून गेले. महाराष्ट्रातील भाजपाचा राजकीय कुंटणखाना बंद होण्याची सुरुवात आहे, असे राऊत यांनी लेखात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त