आदित्य ठाकरेंविरोधात ‘कारस्थान’, सुत्रधाराला मोठी किंमत चुकवावी लागेल : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यात काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण लोक आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे. याचा लवकरच स्फोट होईल.

सुशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभद्री असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात असे राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्रा विरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशा पद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे.

याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल, असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर निवेदन प्रसिद्धीला देत सडेतोड उत्तर दिलं आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तीश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. मुळात या संपूर्ण प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच, सुशांत प्रकरणात कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, असे आवाहनही आदित्य यांनी केली.