महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’चा जोर हवा, संजय राऊतांची राज ठाकरेंना भावनिक साद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या महाराष्ट्रात कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्ष सुरु आहे. कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानानं याची सुरुवात झाली आहे. कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने मुंबईत राहू नये असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यावरुन संजय राऊतांनी मला मुंबई येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी मौन बाळगलं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.

ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्यांचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इतरवेळी पोलिसांबद्दल नेहमी भरभरुन बोलणारे राज ठाकरे कंगना प्रकरणात शांत का झालेत असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे. कंगना प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी मुंबई पोलिसांबद्दल काहीही बोललेलं सहन करणार नाही असा इशारा कंगनाला दिला होता. पण त्याचसोबत कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे हे आम्हाला राजसाहेबांनी शिकवलं आहे, असं सांगत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आणखी काय म्हणाले संजय राऊत ?

संपूर्ण नव्हे निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिने सृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईबोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे.