संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज ! म्हणाले – ‘उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी मे…’ पर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू लावून धरत महाविकास आघाडी राज्यात स्थापन केली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या आपल्या वक्तव्यावर ठाम रहात अखेर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती विराजमान झाली. या सत्तासंघर्षामध्ये संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांना पहायला मिळाला होता.

संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शायराना अंदाजामध्ये विरोधकांना टोला लगावत होते. भाजप नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. काहीही झाले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे ठासून सांगत होते. अखेर ठरल्याप्रमाणे राज्यात सर्वाधिक 104 जागांवर विजय मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यानंतर देखील राऊत यांचा शायराना अंदाज कमी झाला नाही. आपल्या शायराना अंदाजात त्यांनी भाजपवर टीका करणे सुरुच ठेवले. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एक शेर आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में…
पर बेवजह खुश रहने का मजा ही और है…!!

असा शेर राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांनी या शायरीतून नेमकं कुणाला टोला लगावला, हा अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र, नेहमीप्रमाणे आपण खुश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या खुशीतच मोठा आनंद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.