SBI च्या ATM मधून 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम 18 सप्टेंबरपासून बदलणार ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकदा ग्राहकांना रात्रीच्या वेळी पैसे काढताना फसवणुकीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी ओटीपी आधारीत एटीएम विड्रॉल सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सुरू केली होती. याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत जर तुम्ही 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तर तुम्हाला ओटीपी द्यावा लागत होता. आता ही सुविधा दिवसभरात 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढताना सुरू करण्यात येणार आहे. देशभरात ही सुविधा दिली जाणार आहे. 18 सप्टेंबरपासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे.

याचा अर्थ सरळ आहे की, आता 24×7 ओटीपी आधारीत विड्रॉल असणार आहे. या सुविधेमुळं आता एसबीआय एटीएममधून पैसे काढणं अधिक सुरक्षित होईल. एसबीआय डेबिटकार्डधारक ग्राहक फसवणूक, अनधिकृत पैसे काढणं, कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आणि इतर जोखीमांपासून दूर राहतील.

एसबीआय एटीएममध्ये ही सुविधा मिळणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असा तर नेहमीप्रमाणे काढू शकता. फक्त एसबीआयच्या एटीएममधून 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढताना तुम्हाला ओटीपीची गरज पडणार आहे. बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येतो हा ओटीपी तुम्हाला एटीएम मशीनवर एंटर करायचा आहे.