‘आधी चित्रपट पाहा, मग निर्णय द्या’ ; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या काळात या चित्रपटावर बंदी घातल्‍यानंतर निर्मात्‍यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट पाहा, त्यानंतर निर्णय द्या, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

२२ एप्रिलपर्यंत बंद लिफाफ्यातअभिप्राय देण्याचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनावरील स्थगितीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलली आहे. निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहताच बंदी घातली, असे म्‍हणणे निर्मात्यांनी आपल्या याचिकेत मांडले आहे. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे की ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी आणावी की नाही हे निवडणूक आयोगाने चित्रपट पाहूनच ठरवावे. तसेच त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात २२ एप्रिलपर्यंत कळवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच हा चित्रपट अनेक वादांमुळे चर्चेत आहे. निवडणुकीचे उल्लंघन होत असल्यामुळे या चित्रपटावर आक्षेप घेत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी दोनदा बदलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घेतली आहे.