‘शाळा-कॉलेज सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, याउलट…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तशी चिन्हे दिसू लागली असून, दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. राज्यातही रुग्णसंख्या वाढत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनांनी आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन तिथल्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार घेईल. जिथं शाळा सुरू होतील, तिथं सुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यावी. आणि जिथं शाळा सुरू होणार नाहीत, तिथल्या मुलांनी काळजी करू नये. तिथेही योग्य वेळी शाळा सुरू होतील, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तणावमुक्त राहावं असं म्हटलं आहे.

रोहित पवार केवळ ट्विट करून थांबले नाहीत, तर फेसबुकवरही विद्यार्थ्यांसाठी एक छानसा संदेश दिला आहे. जवळपास आठ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत परवा इयत्ता ९ वीपासून पुढच्या वर्गातील शाळा सुरू होत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईलच, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तूर्तास जिथं शाळा सुरू होताहेत, त्यांचा विचार करू. शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, तर उलट आपल्याला आणखी जबाबदारीने वागावं लागणार आहे. यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. सक्तीने मास्कचा वापर करणं, नियमित हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं, शारीरिक अंतर राखणं हे साधे-साधे नियम आतापर्यंत आपल्या सर्वांना पाठ झाले आहेत. नियम साधे असले तरी कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं याकडं दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. प्रत्येकाने हे नियम पाळायचे आहेत. दुस-यालाही नियम पाळण्यास भाग पाडायचे आहे. तेव्हाच हळूहळू रुळावर येत असलेला गाडा तसाच पुढे सुरू राहील.

लॉकडाउनमुळे लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्याने या लोकांची कुटुंबे आज मोठ्या अडचणीत आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल, तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही तर फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायचीय, एवढं हे सोप्प आहे आणि आपण ते कराल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई-ठाण्यासह काही जिल्ह्यांत शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं कोणतंही कारण नाही. योग्य वेळी इथंही शाळा सुरू होतील. तोपर्यंत शहरात बहुतेक ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहेच. आपण घरून अभ्यास करू शकतो. अवांतर वाचन करून वेळेचा सदुपयोग करू शकतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन घेऊ नये. शाळा सुरू झालेल्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.