धक्कादायक ! शाळेनं सतत फीचा तगादा लावल्यानं 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इंदौर : वृत्तसंस्था –    कोरोना महामारीच्या काळात अद्यापही सरकारनं शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. तरीही खासगी शाळांकडून फीसाठी तगादा लावला जात आहे. शाळेच्या प्रशासनाच्या याच त्रासाला कंटाळून दहावीतील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. इंदौरच्या लसूडिया पोलीस ठाणे परिक्षेत्रातील ही घटना आहे.

या घटनेची माहिती मिळताच लसूडिया पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन फेल्ड शाळेतील विद्यार्थी हरेंद्र सिंह गुर्जर यानं शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

हरेंद्र सिंह हा भाऊजींसोबत महालक्ष्मी नगर इथं राहत होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसाठी रोज तगादा लावला होता. इतकंच नाही तर जर फी भरली नाही तर दाखला नेण्याची धमकीही दिली. शाळेच्या दबावामुळं आणि रोजच्या धमकीमुळं हरेंद्र सिंहनं आत्महत्या केली आहे असं त्याच्या भाऊजींनं सांगितलं आहे.

विद्यार्थी संघटनांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा ताफा अडवत शाळांच्या मनमानी कारभाराची तक्रार दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खासगी शाळांना इशाराही दिला होता.