1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने प्रवास, SpiceJet ची ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  31 ऑक्टोबरपासून देशातील पहिली सी प्लेन सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सेवा सुरू करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट असा सी प्लॅनने प्रवास करतील.

31 ऑक्टोबरपासून देशातील विमान कंपनी स्पाइसजेट दररोज दोन उड्डाणे सुरू करणार आहे. या उड्डाण सेवा अहमदाबाद ते केवडिया मार्गावर असतील. या मार्गावरील तिकिटांची प्रारंभिक किंमत उडान सेवा अंतर्गत 1500 रुपये आहे.

Www.spiceshuttle.com या वेबसाइटवरून सी प्लेनचे तिकीट बुकिंग करता येईल. 30 ऑक्टोबरपासून तिकीट बुकिंग सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट विमान सकाळी 10-15 वाजता साबरमती रिव्हर फ्रंटवरून उड्डाण करेल, तर केवडियामध्ये सकाळी 10:45 वाजता लँड करेल.

स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह म्हणाले की, भारतीय विमानचालन इतिहासामध्ये प्रथमच सी-प्लेन उड्डाण करेल. अभिमान आहे की या ऐतिहासिक क्षणी आम्ही एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहोत.

सी-प्लेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. याची सुरुवात पंतप्रधानांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, परंतु आता त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे. आदल्या दिवशी हे सी प्लेन मालदीवहून कोचीला पोचले, त्यानंतर आता ते गुजरातमध्ये आले आहे.