एका मोबाईलचा ‘शोध’ घेताना ‘त्यांच्या’ हाती लागलं २१७ मोबाईलचं ‘घबाड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा आपण कामाच्या गडबडीत बस किंवा रेल्वेमध्ये गर्दी असून देखील चढतो. अशावेळी आपले आपल्या बॅगकडे किंवा पर्सकडे लक्ष नसते. गर्दीमुळे आपल्या महत्वाच्या वस्तू चोरीला जातात. या गोष्टी बसमध्ये, रेल्वेमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात घडत असतात.

मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीला जाण्याची शक्यता खूप असते. बऱ्याचदा मोबाईल चोरीला गेल्यावर पोलीस जेव्हा याचा शोध घेतात तेव्हा त्यांना एक नव्हे तर अनेक चोरीला गेलेले मोबाईल हाती लागतात. दादर रेल्वे स्टेशनवर असाच प्रकार घडला आहे. एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला असता त्याने पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा पोलिसांनी शोध घेतल्यावर एका मोबाईल ऐवजी तब्बल २१७ मोबाईल सापडले.

रेल्वे पोलिसांनी सांगितले की, मोहीद्दूर अहमद अन्सारी यांनी २० जुलैला दादर स्थानकात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दादर रेल्वे पोलिसांकडे केली होती. तक्रारीनुसार, मोबाईल चोरीचा तपास करताना नालासोपारा येथे राहणाऱ्या ४० वर्षाचा जित घोष या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरु केली. चौकशीनंतर असे कळाले की, जित हा नागपाडा येथील चोर बाजारात चोरीचे मोबाईल विकण्याचा व्यवसाय करत होता. चोरीचे मोबाईल खरेदी करणे व विकणे आणि या व्यवहारातून उरलेले मोबाईल नालासोपारा येथे घरी घेऊन जात असे. पोलिसांनी घराची झडती घेतल्यास ११ लाख ४७ हजार ५०० रुपये किंमतीचे एकूण २१७ मोबाईल जप्त केले. या गुन्ह्याची कबुली स्वतः आरोपीने दिली.

या आरोपीला २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्यामुळे मोबाईल चोरीचा आणखी गुन्हे उलगडण्याची शक्यता आहे. हे माबाईल कोणाला विकले ? मोबाईल कोणाकडून घेतले ? याबाबतीत सर्व माहिती मिळेल, असेही रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर प्रवाशांनी गर्दीतून प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी दिले.

You might also like