Coronavirus : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बड्या अधिकार्‍याला ‘संसर्ग’

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा हाहाकार वाढला असून मुंबई आणि ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत कल्याण-डोंबिवलीतही कोरोना वेगाने पसरत असल्याचे दिसून आले आहे. आता तर कल्याण-डोंबिवलीत आरोग्य विभागातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील वैद्यकीय आरोग्य विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तातडीची उपाययोजना म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासकीय इमारत, अल्पबचत भवन व सचिव कार्यालयाची इमारत सॅनेटाईज करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या आकड्याने अवघ्या काही दिवसांतच 800 च्यावर आकडा गेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. महापालिका क्षेत्रात रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई, ठाण्यात नोकरीला जाणा-या कर्मचा-यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रूग्णांमध्ये लहान बालक आणि मुलांचेही प्रमाण वाढत आहे.