अमेरिकेत ‘तुफानी’ वादळ, जमीनीवर कोसळलं विमान, 25 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेतील भीषण वादळामुळे तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या वादळात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत टेनेसी राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या वादळामुळे मोठ्या संख्येने लोक जखमीही झाले आहेत. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग इतका होता की, दुकाने तुटली, गाड्या हवेत उडाल्या आणि हवेत उडणारे विमानही कोसळून खाली पडले. विमान जमिनीवर कोसळताच त्यातील प्रवाशांचा मृत्यू झाला. राज्य प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अलिकडच्या वर्षांत टेनेसीमधील ही सर्वात मोठी आपत्ती आहे. टेनेसीमध्ये आता आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन कर्मचाऱ्यांना अनेक मृतदेह ढिगाराखाली दबलेले मिळाले. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे सांगितले की, नैशविले शहरातील सुमारे ४० इमारती कोसळल्या आहेत. येथे गॅस गळती होण्याचीही शक्यता आहे. तसेच पुतनाम काउंटी शेरिफच्या कार्यालयाने सांगितले की, वादळ मुळात कुकविले आणि बक्सटर शहरात आले होते. या ठिकाणी अनेक घरे नष्ट झाली. वादळामुळे डेव्हिडसन, विल्सन, पुतनाम आणि जॅक्सन काउंटीमधील ७३००० हून अधिक घरे व इमारतीतील वीज खंडित आहे. याशिवाय रोडवे, पूल आणि विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे.

ही परिस्थिती पाहता टेनेसीचे गव्हर्नर बिल ली यांनी राज्यात आपत्कालीन स्थिती जाहीर केली असून 4 निर्वासित केंद्रे सुरू करण्याचे सांगितले आहे. राज्यपालांनी बाधित भागालाही भेट दिली. तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी वादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाणून घेण्यासाठी राज्य दौर्‍यावर येण्याची घोषणा केली. नुकसान भरपाईच्या मुल्यांकनात राज्य अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, विना-अनिश्चित सार्वजनिक इमारती आणि परिसरातील अनेक शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या भागाचे मुख्य नैशविले आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहे आणि वेस्टर्न नैशविले मधील जॉन सी ट्यून विमानतळाने सांगितले की, तेथे बरेच नुकसान झाले आहे. नैशविलेचे महापौर जॉन कूपर यांनी सांगितले कि, जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनुसार सुमारे दीडशे लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी टेनेसीमध्ये प्राथमिक निवडणुका असून या वादळामुळे अनेक मतमोजणी साइट प्रभावित झाले आहेत. लोकांना मतदान करता यावे यासाठी ही बूथ आता अन्य ठिकाणी हलविण्यात येणार आहेत.