शाहिनबागचे सामाजिक कार्यकर्ते शहजाद अली यांचा BJP मध्ये प्रवेश, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाहीन बागचे सामाजिक कार्यकर्ते शहजाद अली यांनी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप नेते श्याम जाजू देखील उपस्थित होते. भाजपात प्रवेश केल्यांनतर अली म्हणाले की, मी भाजपमध्ये सामील झालो आहे, आमच्या समाजातील काही लोक भाजपाला आपला शत्रू मानतात, मी त्यांना चुकीचे सिद्ध करू इच्छितो. याशिवाय सीएएच्या मुद्दय़ावरही आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास बसू. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने सीएएविरोधात शाहीन बागेतील होणाऱ्या निषेधास मोठा मुद्दा बनविला होता, पण आता त्याच भागातील एक समाजसेवक आणि तरूण मुस्लिम चेहऱ्याने कमळ हातात घेतले आहे.

यामुळे उडाली होती खळबळ
दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये मोदी सरकारने संसदेमधून सीएए (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) मंजूर करून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला, ज्या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळाला बळी पडल्यानंतर भारतात येणार्‍या बिगर-मुस्लिम शरणार्थीना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

या कायद्यांतर्गत धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या या तिन्ही देशांतील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल.परंतु या कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायाने देशभरात धरणे आंदोलन केले, ज्यामध्ये दिल्लीच्या शाहीन बागचे धरणे संपूर्ण जगात चर्चेत होते. इतकेच नाही तर सीएएला कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला.