राज्यात सत्तेत एकत्र असतानाही शरद पवारांचा काँग्रेसला उपरोधिक टोला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. या मतदारसंघात आम्ही नाही तर मग कोणीच नाही, हे सांगली मतदारसंघात घडले. हा राजकारणातील ट्रेन्ड घातक आहे. ते कुणामुळे घडले यावरती मी भाष्य करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिलाने निवडणूक लढवली का? कार्यकर्त्यांनी ते समजून घेतले पाहिजे, अशी उपरोधक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या वारसांवर केली.

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिरज येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवाची सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा आठ हजार मतांना पराभव झाला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पुथ्वीराज पाटील यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने काम केले असते तर कदाचित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पराभव झाला नसता. सांगली मतदारसंघातही तेच झाले. येथील लोकांना वाटले की आम्ही नाही तर दुसरा कोणीच नाही. हा ट्रेन्ड राजकारणात चालत नाही. कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. नाहीतर पक्ष अडचणीत येईल, असे शरद पवार यांनी सांगितले. सांगली मतदारसंघामध्ये हे कोणामुळे झाले यावर भाष्य मी करणार नाही असे सांगत शरद पवार यांचा रोख वसंतदादा पाटील यांच्या वारसदारांवर होता. शरद पवार यांनी केलेल्या या उपरोधिक टीकेची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.