शशांक मनोहर यांनी ICC च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, ECB प्रमुख कॉलिन ग्रेव्हस होऊ शकतात नवे चेअरमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयसीसीचे अध्यक्ष म्हणून दोन वर्षे कार्यभार सांभाळणाऱ्या शशांक मनोहर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष नियुक्त होईपर्यंत डेप्युटी चेअरमन इम्रान ख्वाजा आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. आयसीसीच्या नव्या अध्यक्षपदासाठी पुढील आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार शशांक मनोहर यांच्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) चीफ कॉलिन ग्रेव्हस आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात.

बातमीनुसार इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज कॉलिन ग्रेव्हसच्या बाजूने मतदान करू शकतात. दुसरीकडे बीसीसीआयचेही ग्रेव्हससोबत चांगले संबंध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप ग्रेव्हस यांच्या बाजूने आपली स्पष्टता दिलेली नाही. विशेष म्हणजे अनेकांचा विश्वास होता की आयसीसीचे अध्यक्ष असताना शशांक मनोहर यांचे निर्णय बीसीसीआयच्या हिताचे नव्हते. दोनदा बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळलेले शशांक मनोहर हे सुप्रसिद्ध वकीलही आहेत.