वडिलांच्या अंत्यविधीपुर्वी तिनं दिला 10 वी परिक्षेचा पेपर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सकाळी अकरा वाजता दहावीचा हिंदी संयुक्तचा पेपर त्याच दिवसाच्या मध्यरात्री दोन वाजता वडिलांनी जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत वडिलांच्या अंत्यविधीच्या अगोदर लासलगाव येथील जिजामाता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी वाघ हिने दहावीचा पेपर दिला. “बाबा मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नका ना सोडून जाऊ आम्हाला…” अशी आर्त हाक तिने तिच्या बाबांना मारली आणि अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदायाचा अश्रूंचा बांध फुटला. ही हृदयाला हेलावून टाकणारी घटना लासलगाव येथील सर्वे नं.९३ येथे घडली आहे.

शुक्रवार (दि.६) मध्यरात्री दोन वाजता रमेश वाघ ( वय ४२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीत असणारी नंदिनी वाघ दहावीची परीक्षा असल्याने वडिलांचे आजारपण दूर ठेवून आपला अभ्यास करत होती. मात्र मध्यरात्री वडिलांचे अचानक निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. त्याच दिवशी सकाळी वडिलांचा अंत्यविधी आटपायच्या आधी थेट परीक्षा केंद्रावर ती दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रु थांबता थांबत नव्हते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, शंतनू पाटील, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापिका सुधा आहेर, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड तसेच निफाड पंचायत समिती सदस्या रंजना पाटील व संस्थेच्या संचालिका निता पाटील यांनी नंदिनीस परिस्थितीची जाणीव करून देऊन तिला दहावीचे पेपर देण्यास प्रोत्साहित केले. तसेच तिचे नातेवाईक, सगेसोयरे, शिक्षक यांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिला एक बहीण व दोन भावंडे आहेत. अखेर वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची वाताहात झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे