शिरूर-हवेली मतदारसंघात तीन कोविड केअर सेंटरला परवानगी

शिरुर : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी जवळील मागासवर्गीय मुलींचे होस्टेल येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये शिरूर तालुक्यातील कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांना शिरूरमध्येच त्यांचे नमुने घेण्याचे व त्यांच्यावर उपचार करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

तसेच आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शिरूर-हवेली मतदारसंघात तीन कोविड केअर सेंटर यांना परवानगी मिळाली असून या कोविड केअर सेंटरकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सहकार्य केले आहे.

यामुळे शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णाला आता शिरूर शहरात उपचार मिळणार असून संशयित रुग्णाचे नमुनेही शिरूर येथे घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगून आता, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित नागरिकांनाही आता या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याची सोय झाली आहे.

शिरूर-हवेली मतदार संघात शिरूर, वाघोली, लोणीकाळभोर याठिकाणी केअर सेंटर यांना परवानगी मिळाली असून वाघोली व शिरूर येथील हे सेंटर सुरू करण्यात आले आहेत .

पुणे येथे कोरोना बाधित रुग्ण किंवा संशयित गेल्यावर तेथे आधीच गर्दी असून कोरोना नमुने घेण्यास व त्याचे अहवाल येण्यास, उपचार होण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे शिरूर येथे कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. वाघोली, शिरूर व लोणीकाळभोर या ठिकाणी सेंटर मंजूर झाली आहेत त्यापैकी वाघोली व शिरूर येथील सुरू झाली असून लवकरच लोणी काळभोर येथील हे सेंटर सुरू होईल.

-आमदार अशोक पवार, शिरूर-हवेली.

लवकरच लोणी काळभोर कोविड केअर सेंटर सुरू होईल तर याठिकाणी शिरूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित रुग्णाला उपचार देणार आहेत. कोरोना बाधित संशयित रुग्णाला आयसोलेशन क्वारंनटाईन करण्यात येणार असून, त्याच्या वर लक्ष ठेवून, त्यांच्यात काही लक्षणे दिसली तर त्यांच्यावर येथेच उपचार सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शिरूर व शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णाला आता पुणे येथे जाण्याची गरज नसून शिरूर शहरात या कोविड सेंटरमध्ये रुग्णाची तपासणी व त्याच्यावर उपचार होणार आहे. एखादा रुग्ण जास्त क्रिटिकल असेल तर अशा रुग्णांना पुणे येथे शिफ्ट करण्यात येईल.

शिरूर शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये, कोरोना बाधित रुग्णांच्या डायरेक्ट संपर्कात आलेल्या 15 जणांना क्वारंटाईन केले असून, त्याच्यात लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर येथेच उपचार होणार आहे.

-तुषार पाटील (वैद्यकीय अधीक्षक, शिरूर ग्रामीण रुग्णालय